वृक्षतोडीविरोधात आदिवासी आक्रमक

‌‘सह्याद्री वाचवा, आदिवासी वाचवा‌’चा एल्गार; कर्जत प्रांत कार्यालयावर धडक, टोरेंट हटावचा नारा

| नेरळ | प्रतिनिधी |

सह्याद्रीच्या जंगलांवर कुऱ्हाड चालवून आदिवासींचे अस्तित्वच मिटवण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा इशारा देत आदिवासी समाज टोरेंट कंपनीविरोधात आक्रमक झाला आहे. साईडोंगर जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना एकवटल्या असून, कर्जत तालुका आदिवासी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली कर्जत ते प्रांत कार्यालय असा शुक्रवारी दि. 6 मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‌‘सह्याद्री वाचवा, आदिवासी वाचवा‌’, ‌‘जल, जंगल, जमीन आमच्या हक्काची‌’ आणि ‌‘टोरेंट हटाव‌’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

टोरेंट कंपनीच्या साईडोंगर जलविद्युत प्रकल्पासाठी 20 ऑक्टोबरपासून वृक्षतोड सुरू झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. आता आदिवासी संघटनांनीही आंदोलनात उडी घेतल्याने प्रकल्पविरोधी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. सह्याद्री बचाव आदिवासी संघर्ष समितीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. मोर्चानंतर प्रांत कार्यालयाबाहेर निषेध नोंदवून प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

या मोर्चात आदिवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव, देवराम लांडगे, पर्यावरण समितीचे ॲड. कैलास मोरे, मालू निरगुडे, कर्जत आदिवासी संघटनेचे अध्यक्ष कांता पादिर, माजी अध्यक्ष जैतू पारधी यांच्यासह रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांनी भाषणांतून टोरेंट प्रकल्प आदिवासी समाजासाठी घातक असल्याची भूमिका मांडली. आदिवासींचे अस्तित्व आणि निसर्गसंपन्न परिसर उद्ध्वस्त करणारे प्रकल्प सहन केले जाणार नाहीत. आदिवासी समाज क्रांतिकारी असून आपल्या हक्कांसाठी तीव्र लढा उभारण्यास सज्ज आहे, असा इशाराही देण्यात आला.

Exit mobile version