‘या’ शहरातील बेशिस्त वाहनचालकांमुळे होतोय त्रास

बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न
| उरण | वार्ताहर |
उरणसारख्या छोट्या शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना नेहमीच करावा लागत आहे. याचा फटका शालेय विद्यार्थी व चाकरमान्यांना बसत असल्याने शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच नगरपालिकेने कारवाई केलेल्या टपरी पुन्हा टपरीधारकांना मिळाल्याने त्यांनी आपले बस्तान पुन्हा बसविले असल्याने शहराला टपरीधारकांचा विळखा पडला असल्याचे चित्र पहावयास मिळते.

उरण शहरातील बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. नगरपरिषदेने शहरात सम, विषम तारखांचे व नो पार्किंगचे फलक बसविले आहेत. अशा फलकांनंतर वाहनांवर कारवाई होणार का, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वीही उरण नगरपरिषदेने अशा प्रकारचे फलक बसविले होते. मात्र, त्याची अनेक वर्षे अंमलबजावणी न झाल्याने कोंडीत भर पडली आहे. तर बहुतांशी ठिकाणी नो पार्किंगच्या फलकाशेजारीच मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करून ठेवली जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या होणार की कारवाई होणार या संदर्भात उरणकरांकडून शंका व्यक्त केली जात आहे.

उरण नगरपरिषदेने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी यंत्रणा राबवावी, कोंडीला कारणीभूत असलेल्या त्रुटी दूर कराव्यात आणि त्यानंतर नागरिकांचे सहकार्य मागावे, असेही अनेक नागरिकांचे मत आहे. नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागामार्फत टपरीधारकांवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या होत्या. परंतु आर्थिक साटेलोटातून त्या पुन्हा टपरी धारकांना दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा टपरीधारकांनी टपरी होती त्याच ठिकाणी बसविल्या आहेत. यावरून उरणमध्ये टपरीराज दिसत आहे. यातील काही टपरी या राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी यांच्या असल्याचे समजते. तसेच वाहतूक पोलीस व त्यांच्या मदतीसाठी जे कर्मचारी वर्ग असले तरी भर रस्त्यात वहाने उभी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे उरणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version