| आगरदांडा | प्रतिनिधी |
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सन-2025 मध्ये टीबीमुक्त घोषित झालेल्या मुरूड तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. हा सोहळा मुरुड पंचायत समितीमधील महाराष्ट्र भुषण आ.डॉ. ति.श्री. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात येथे उत्साहात पार पडला.
यावेळी पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ, उपसभापती अश्विनी जंगम, गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय सोळंके, कोर्लई ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री मिसाळ, औषधोपचार पर्यवेक्षक संकेत घरत, विजय वाघमारे, शालीकराव पावरा, मयुर पाटील, आरोग्य सेवक राजेंद्र चुनेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सन-2025 मधील कामगिरीच्या आधारे कोर्लई, नांदगाव आणि वेळास्ते या ग्रामपंचायतींना गोल्ड श्रेणी, मजगाव, साळाव आणि तेलवडे यांना सिल्व्हर श्रेणी, काकळघर, मिठेखार, सावली, तलेखार, वावडूंगी आणि वळके या ग्रामपंचायतींना ब्राँझ श्रेणी या ग्रामपंचायतींना सभापती निलेश घाटवळ, उपसभापती अश्विनी जंगम व पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य विभागाने उपस्थितांना ‘निक्षयमित्र’ बनून क्षयरुग्णांना पोषण व मानसिक आधार देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सभापती निलेश घाटवळ व कोर्लई ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री मिसाळ यांनी पाच क्षयरुग्ण दत्तक घेण्याची घोषणा केली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय सोळंके यांनी क्षयरोगाची लक्षणे, उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन केले. तसेच लवकर निदान, योग्य उपचार आणि समाजाचा सक्रिय सहभाग यामुळेच टीबी मुक्त समाजाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे प्रतिपादनदेखील केले. यावेळी उपस्थितांनी टीबीमुक्त मुरूड तालुका घडविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
टीबीमुक्त बारा ग्रामपंचायतींचा गौरव
