25 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
| डोंबिवली | वृत्तसंस्था |
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हे दोघे डोंबिवली जवळील दिवा-साबे गावातील रहिवाशी आहेत. पोलिसांनी या दोघा तस्करांवर गुन्हा दाखल केला आहे. साहिल लक्ष्मण बोराडे (रा. साबेगाव, जिवदानी नगर, दिवा पूर्व), प्रकाश गंगाराम जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत.
साबे गावातील दोन तरूण डोंबिवली पूर्वेतील नेहरू रस्त्यावरील उद्यान भागात गांजा विक्रीसाठी येणार आहेत, अशी गुप्त माहिती रामनगर पोलीसांना मिळाली होती. या माहितीप्रमाणे पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अच्युत मुपडे यांनी पोलिसांची दोन पथके तयार करून शुक्रवारी रात्री नेहरू रस्ता भागात सापळा लावला. रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान दोन इसम ठरल्या वेळेत नेहरू रस्त्यावर फिरू लागले. त्यांच्याजवळ एक खोका होता. पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. बराच उशीर ते एकाच जागी रेंगाळू लागले. हेच ते आरोपी असल्याची खात्री मुपडे यांना पटल्याबरोबर पोलिसांनी या दोघांना पकडले. तेथे त्यांची झडती घेतली. त्यांच्या जवळील खोक्यात प्लास्टिकच्या पिशव्यात दोन किलोहून अधिक गांजाची पावडर आढळून आली. त्याची बाजारातील किंमत 25 हजार रूपये आहे. गांजाची तस्करी केल्याने पोलिसांनी गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे औषधद्रव्य अधिनियमाने तस्करांवर गुन्हा दाखल केला. त्यांना न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.