| पनवेल | वार्ताहर |
ऑटो रिक्षातील चालक आणि दोन पॅसेंजरनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवून तरुणाचा मोबाइल आणि रोख रकमेची चोरी केली. मिथुन चव्हाण याने (19), रा. घोटगाव, नितळस फाटा येथे रात्री साडेदहाच्या दरम्यान शेअरिंग ऑटो रिक्षामध्ये बसला. त्यात दोन माणसे आधी बसली होती. त्यानंतर ऑटो रिक्षा निघोन कंपनीच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत नितळस रोड येथे आली असता ऑटोचालकाने लघुशंकेसाठी रिक्षा उभी केली. त्यानंतर दोघांनी मिथुनला मारण्यास सुरुवात केली. याबाबत ऑटोचालकाकडे मदत मागितली असता त्यानेही मारहाण केली. त्यातील एकाने खिशातील चाकू काढून गळ्याला लावला आणि मोबाइल आणि खिशातील तेराशे रुपये काढून घेतले. त्यानंतर मिथुन याला तेथेच टाकून तिघेही ऑटो रिक्षाने डोंबिवली-ठाण्याच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तळोजा पोलिस करीत आहेत.