| खोपोली | हनुमंत मोरे |
बोरघाटात वेगवेगळ्या अपघातात दोन वाहने दरीत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत जीवितहानी टळली असून एका चालकाला अपघातग्रस्त टीम या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत दरीतून बाहेर काढले. खंडाळा घाटात सनसेट पॉईंट व सायमाळजवळ हा अपघात घडला आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खंडाळा सनसेट पॉईंट, वाघजाई मंदिरजवळ पिकअप रस्त्यावरील सुरक्षा कठडा तोडून थेट दरीत झाडाला अडकली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी व अपघातग्रस्त टीम या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत पिकअप गाडीच्या चालकाला शर्तीचे प्रयत्न करत बाहेर काढले. सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक अपघात घडला तर दुसरा अपघात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सायमाळजवळ घडला.
पुण्याकडे जाताना काही प्रवाशांनी विश्रांतीसाठी रस्त्याच्या बाजूला अर्टिका कार थांबवली. प्रवासी खाली उतरल्यानंतर न्यूट्रल असलेली ही कार 150 फूट दरीत कोसळली. सुदैवाने गाडीत कोणीही प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली.