रत्नागिरीत अनधिकृत गर्भपात सेंटरवर धाड

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

रत्नागिरी औद्योगिक वसाहतीत अनधिकृतपणे गर्भपात सेंटर चालवणार्‍या एका खाजगी दवाखान्यावर शुक्रवारी (दि.26) रात्री वैद्यकीय पथकाने धाड टाकून या पथकाने रुग्णालयात सुरू असलेल्या गर्भपाताप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई आरोग्य पथक आणि पोलिसांनी संयुक्तपणे केली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी अनंत नारायण शिगवण (67) यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन नोटीस देण्यात आली आहे.

रत्नागिरी औद्योगिक वसाहतीत टि.आर.पी. येथील साई हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी अनंत नारायण शिगवण राहणार एम.आय.डी.सी. प्लॉट नं. 20, टी.आर.पी. रत्नागिरी यांच्याकडे वैद्यकीय गर्भपात कायदा सन 1971 व सन 2023 मध्ये नमुद आवश्यक असलेली वैद्यकीय शैक्षणिक पात्रता व अनुभव नसताना तसेच, गर्भपात केंद्राची मान्यता नसताना त्यांनी त्यांच्या मालकीच्या साई हॉस्पीटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून गर्भपाताच्या गोळ्या अनधिकृतपणे रुग्णांना देत होते. याप्रकरणी वैद्यकीय गर्भपात कायदा सन 1971 चे कलम 4 व 5 प्रमाणे त्यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना आरोग्य विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे.

Exit mobile version