पार्थ कन्स्ट्रक्शन अडचणीत; ठेक्यात मुरुमाचा उल्लेख, प्रत्यक्षात स्लॅगचा भराव
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथे वासवाणींच्या जागेत झालेल्या अनधिकृत भरावामुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे तसेच कृषीवलच्या दबावामुळे प्रशासनाने कारवाई करीत अनधिकृत भराव थांबविला. प्रशासनाने स्थळ पाहणी करुन वासवाणींच्याविरोधात तिसर्यांदा गुन्हा दाखल केला. मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. वासवाणी यांनी दिलेल्या वर्क ऑर्डरमध्ये मुरुमाचा भराव करण्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात स्लॅगचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे वासवाणी यांनी भरावाचे काम दिलेल्या पार्थ कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर येत आहे.
मिळकतखार येथील वासवाणी यांच्या जागेचा आणि भरावाचा विषय गेले कित्येक दिवस चर्चेत राहिला आहे. कांदळवनाची कत्तल, सीआरझेड तसेच नॉन डेव्हलपमेंट झोन क्षेत्रात भराव, बोगस रॉयल्टीच्या पावत्या आदी विविध कारणांमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता माहितीच्या अधिकारांत मिळालेल्या माहितीवरुन अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ग्रामपंचायतीकडे मागण्यात आलेल्या एनओसीमध्ये खाडाखोड केल्याने संशयाचं जाळं अधिक गडद झालं आहे.
कारभार संशयास्पद
रवी हरिकिसन वासवानी यांनी ग्रामपंचायतीला केलेल्या अर्जात त्यांनी तात्पुरत्या रस्त्यासाठी मातीचा भराव करण्याची तसेच नाला स्वच्छतेसाठी व साफसफाईसाठी परवानगी मागितली होती. 25 नोव्हेंबर रोजी हा अर्ज करण्यात आला होता. त्यानूसार 3 डिसेंबर 2024 रोजी ग्रामपंचायतीने त्यांना काम करण्याची परवानगी दिली. वासवानी यांनी ग्रामपंचायतीकडे केलेल्या अर्जात कुठेही स्लॅगचा उल्लेख केलेला नाही. मात्र पार्थ कन्स्ट्रक्शनने ग्रामपंचायतीकडे परवानगीसाठी केलेल्या अर्जात स्लॅगचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय हा शब्द हाती लिहिण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे पार्थ कन्स्ट्रक्शनसह ग्रामपंचायतीच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वर्क ऑर्डरमध्ये छेडछाड
वासवाणी यांनी पार्थ कन्स्ट्रक्शनचे मालक जितेंद्र जयराम बेर्डे, कनकेश्वर फाटा, अलिबाग यांना हे काम देण्याचे निश्चित केले. त्यानंतर वासवाणींन दिलेल्या वर्क ऑर्डरमध्ये मुरुम मातीचा भराव करण्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. मात्र वर्क ऑर्डरच्या विषयात छेडछाड करुन त्या ठिकाणी स्लॅग असे करण्यात आले आहे. पूर्ण वर्क ऑर्डर वाचल्यानंतर ही बाब लक्षात येते. खाडाखोड करताना त्यांनी केवळ विषयात खाडाखोड केली. मात्र बाकी ठिकाणी मुरुमाचा भराव खोडायला विसरल्याने त्याचा भांडाफोड झाला आहे.
वासवाणींची भूमिका काय?
कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन वासवाणींसह प्रशासनाचीदेखील फसवणूक करण्यात आली आहे. ठेकेदारांच्या चुकीमुळे वासवाणींना गुन्ह्यांची हॅटट्रिक मारावी लागली असल्याची चर्चा आत परिसरात सुरु झाली आहे. याबाबत वासवाणी नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सार्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
जेएसडब्ल्यूविरोधात गुन्हा दाखल करा
माहितीच्या अधिकारांत मिळालेल्या माहितीनूसार, मिळकतखार येथील वासवाणी कंपनीच्या हद्दीत वासवाणींच्या आदेशानूसार कनकेश्वर फाटा येथील पार्थ कन्स्ट्रक्शनचे मालक जितेंद्र जयराम बेर्डे भराव करीत आहेत. मंडळ अधिकारी नलिनी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार भरावाची स्लॅग जेएसडब्ल्यू कंपनीने पुरवली असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रकरणात जेएसडब्ल्यू कंपनीलाही सहआरोपी करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी पोलीस अधीक्षक तसेच तहसिलदारांना दिले आहे.
ट्रक चालकांवर कारवाई होणार का?
बेकायदेशीर भराव करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक क्र. एमएच 06.एक्यू.1591 व एमएच 43 बीपी 6393 तसेच जेसीबी एमएच 17 सीएक्स 0887 या वाहनांचा वापर केल्याचा उल्लेख तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अलिबाग यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये आहे. त्यामुळे या वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांनाही या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.