| मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या 74 व्या वर्षी दीर्घ आजाराने गुरुवारी (दि.6) निधन झाले. 3 डिसेंबरला त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून प्रकृतीची माहिती दिली होती आणि आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. संझगिरी हे एक स्तंभलेखक, लेखक, सूत्रसंचालक होते. जवळजवळ 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी प्रामुख्याने मराठीत आणि काही इतर प्रादेशिक भाषांमध्ये तसेच इंग्रजीमध्येही स्तंभलेखन केले आहे. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईतील दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनीत झाला. त्यांनी किंग जॉर्ज स्कूल आणि रामनारायण रुईया कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पुढे त्यांनी व्हीजेटीआय माटुंगा येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीई केले. द्वारकानाथ संझगिरी हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून काम सुरू केले आणि 2008 मध्ये पाणीपुरवठा प्रकल्पांचे मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले. त्याबरोबर त्यांनी क्रिकेटवरील लिखाण सुरू ठेवले होते.
3 डिसेंबरला त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत फेसबूकवर पोस्ट लिहिली होती. त्यांनी लिहिलेली मराठी पुस्तकं- शतकात एकच – सचिन, चिरंजीव सचिन, दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी, खेलंदाजी, बोलंदाजी, चॅम्पियन्स, चित्तवेधक विश्वचषक 2003, क्रिकेट कॉकटेल, क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स, कथा विश्वचषकाच्या, लंडन ऑलिम्पिक, पॉवर प्ले, स्टंप व्हिजन, संवाद लिजंड्सशी, स्टंप व्हिजन/क्रिकेट गाथा, थर्ड अंपायर, इंग्लिश ब्रेकफास्ट.1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी लेखन कारकिर्दीला सुरुवात केली, त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ सारख्या मासिकांमध्ये नियमितपणे लेखन केले. भारताने 1983 मध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी काही इतर मित्रांसह ‘एकाच शतक’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले ज्याचे संझगिरी कार्यकारी संपादक म्हणून काम करत होते. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून, संझगिरी यांनी ‘लोकसत्ता’, ‘आज दिनांक’, ‘संज लोकसत्ता’, ‘मिड-डे’, ‘तरुण भारत’, ‘पुढारी’ आणि इतर अनेक प्रकाशनांसाठी स्तंभलेखन करण्यास सुरुवात केली. ‘लोकसत्ता’ मधील त्यांचे क्रीडा लेख आणि प्रवासवर्णन स्तंभांना खूप प्रतिसाद मिळाला. ते 25 वर्षांहून अधिक काळ ‘सामना’ या वृत्तपत्रासाठी क्रिकेट स्पर्धांचे वृत्तांकन देखील करत आहेत. द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून आजपर्यंतच्या सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धांचे लेखन केले आहे. स्तंभांव्यतिरिक्त, त्यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.