संस्थेमार्फत भावपूर्ण आदरांजली
अलिबाग | प्रतिनिधी |
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष व अलिबागेतील हिमांशू ज्वेलर्सचे मालक हिम्मतमल तथा काका जैन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने आदर्श पतसंस्थेची हानी झाली असून,संस्थेच्या उभारणीत त्यांचे योगदान होते,असे प्रतिपादन आदर्शचे चेअरमन सुरेश पाटील यांनी येथे केले.
काका जैन यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत मान्यवरांनी जैन यांच्या कार्याचे कौतूक केले. काका जैन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 23 वर्ष कार्यरत हिते. आदर्श पतसंस्थेच्या स्थापनेमध्ये व जडणघडणी मध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते . संस्थेच्या स्थापनेपासून काका आदर्शच्या उपाध्यक्ष पदी होते. ते आदर्शचे विद्यमान संचालक होते. समाजातील दुर्बल घटक व छोटा व्यापारी वर्ग यांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील व संचालक यांच्या सोबतीने त्यांनी अतिशय मेहनतीने ही संस्था वाढविली व सर्वदूर पोहोचविली,त्यांनी सेवाभावी वृत्तीने आपल्या आयुष्यातील बराच वेळ आदर्शसाठी दिला. आदर्श संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी योजना स्वतः सक्रिय राहून राबविल्या , संचालक मंडळ व कर्मचारी वर्गामध्ये ते अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व होते,असे ते म्हणाले.
काकांनी श्री जैन संघाचे 10 वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले, अलिबाग सराफ संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली होती. काकांच्या निधनामुळे अलिबागमधील व्यापारी वर्गातही हळहळ व्यक्त होत आहे . आदर्श पतसंस्था परिवार व व्यापारी वर्ग व अलिबाग परिसरातील प्रतिष्ठित नागरीक यांच्याकडून काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
काका जैन यांच्या निधनामुळे आदर्श परिवाराची व संस्थेची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे,आदर्शच्या जडणघडीतील वटवृक्ष हरपला, अशा शब्दात आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी काकांना श्रद्धांजली वाहिली.