मराठी पत्रकार संघाचे अनोखे आंदोलन

। उरण । वार्ताहर ।
उरण शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याबाबत उरण नगरपालिकेला निदर्शनास आणूनही त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. त्याच्या निषेधार्थ बुधवार (20) रोजी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने नगरपालिका प्रशासनाच्या गेट बाहेर असलेल्या खड्डयात झाड लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध करून लवकरात लवकर शहरातील खड्डे बुजवावे अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा पत्रकार संघाने दिला आहे.

गेले काही दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणच्या रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज येत नव्हता. काहीवेळा दुचाकी खड्डयात पडून अपघात झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्डयात काही जणांना दुखापत झाली आहे. तरीही नगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नव्हती. विशेष म्हणजे नगरपालिका प्रशासनाच्या गेट बाहेर मोठा खड्डा गेले अनेक दिवसांपासून आहेत त्याकडे ते लक्ष देत नाहीत, तर शहरातील इतर खड्यांकडे कसे लक्ष देतील असा सवाल उपस्थित होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष घन:श्याम कडू, अजित पाटील,विरेश मोडखरकर, आशिष पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version