। उरण । वार्ताहर ।
प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना जेएनपीटीच्या माध्यमातून साडेबारा टक्के भूखंड वाटपासाठी भरावाचे काम सुरू आहे. भरावासाठी माती ऐवजी चिखलाचा वापर खुलेआम केला जात आहे. याची चौकशी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून जोर धरू लागली आहे.
जेएनपीटी प्रकल्पग्रस्त बाधीत शेतकर्यांना साडेबारा टक्केचे भूखंड विकसित करून देण्याचे काम सुरू आहे. यासाठी दास्तान फाटा येथील जागेमध्ये भरावाचे काम सुरू आहे. भरावासाठी मातीचा वापर करणे बंधनकारक असतानाही ठेकेदारांनी सुरुवातीला मातीचा वापर केला आहे. त्यानंतर ठेकेदारांनी नियमांची पायमल्ली करून खुलेआम चिखलाचा व जुन्या इमारतींचा निघालेला राबीटचा ही भरावासाठी वापर केला जात आहे. याबाबत प्रकल्पग्रस्तांच्या संघटनानी लेखी तक्रार करून सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. याकडे जेएनपीटी प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्यानेच आजही ठेकेदार खुलेआम चिखलाचा भराव करीत असल्याचे चित्र दिसत आहे.