भाजपच्या मदतीसाठी आरएसएस मैदानात
। उत्तरप्रदेश । वृत्तसंस्था ।
उत्तरप्रदेशामधील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. उत्तरप्रदेशातील भाजपाच्या योगी सरकारविरोधात वाहत असलेले वारे पाहता ही तयारी सुरू असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तिरंगा यात्रा काढून भाजपाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याची तयारी आरएसएसने सुरू केली आहे. उत्तरप्रदेशातील जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी अनेक कार्यक्रम आखत आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा कार्यक्रम 19 नोव्हेंबर, भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटीशांशी लढणार्या राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीपासून 16 डिसेंबर ज्या दिवशी भारताने 1971च्या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला होता तोपर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी आरएसएसने ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची संघर्षगाथा विविध संघटना आणि समाजाच्या मदतीने समाजासमोर आणणार आहे. यासाठी वंदे मातरम गायन, तिरंगा यात्रा, परिसंवाद, पथनाट्य अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बलिदान दिलेल्या वीरांची माहिती लोकांना दिली जाणार आहे.
या अमृत महोत्सवांतर्गत गावोगावी भारत मातेचे पूजन, वंदे मातरमचे गायन, तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. शिख धर्माचे नववे गुरू गुरू तेग बहादूर सिंग यांच्या 400व्या जयंतीनिमित्त आरएसएस मोठे कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित करणार आहे.