तब्ब्ल 253 पदे रिक्त
| अलिबाग | भारत रांजणकर |
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची अनेक पदे रिक्त असल्याने अनेक अधिकार्यांकडे अतिरिक्त पदभार सोपवावे लागत असल्याने कामाचा प्रचंड ताण असल्याने रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तब्बल 253 पदे रिक्त आहेत. यात तिन उपजिल्हाधिकारी आणि एक तहसिलदार पदाचादेखील समावेश आहे. पदे रिक्त असल्याने अनेक कामे देखील रखडली जात असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासावर होत आहे.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात एकुण 1 हजार 312 पदे मंजुर आहेत. त्यापैकी 1 हजार 059 पदे भरलेली आहेत. त्यामुळे उर्वरित 253 पदे ही रिक्तच आहेत. सर्वात महत्वाचे असलेले उपजिल्हाधिकारी पदासाठी 19 पदे मंजुर आहेत. त्यापैकी 16 पदे भरण्यात आली आहेत. तर 3 पदं रिक्त आहेत. यात नव्यानेच रिक्त झालेले जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, उपजिल्हाधिकारी पुर्नवसन, भुसंपादन समन्वयक उपजिल्हाधिकारी ही पदे रिक्त आहेत. या पदांपैकी नुकतेच रिक्त झालेले जिल्हा पुरवठा अधिकारी या महत्वपुर्ण पदाचा कार्यभार सध्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे गेली दोन वर्षांहुन अधिक काळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या पदाचा देखील अतिरिक्त पदभार आहे.
सामान्य प्रशासन आणि पुर्नवसन विभागाचा अतिरिक्त पदभार भुसंपादन रायगड शुन्य विभागाचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. तसेच भुसंपादन समन्वयक पदाचा अतिरिक्त पदभार निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाले यांच्याकडे देण्यात आलेला आहे. तत्कालिन अलिबाग तहसिलदार मिनल दळवी यांना लाच घेताना पकडल्यानंतर अलिबागचे तहसिलदार पद देखील दीड महिन्यांहून अधिक काळ रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार तहसिलदार (सर्वसाधारण) विशाल दौंडकर यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. अलिबाग तालुक्यासाठी हे महत्वपुर्ण पद असल्याने नागरिकांचे अनेक प्रश्न, समस्या रखडलेले आहेत. त्यामुळे हे पद तातडीने भरण्यात येण्याची आवश्यकता आहे.
तसचे 74 नायब तहसिलदार पदे मंजुर असलेल्या पैकी 61 पदेच भरण्यात आलेली आहेत. उर्वरित 13 पदे रिक्तच आहेत. त्यामुळे अनेक पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकार्यांकडे आहे. लघुलेखक उच्चश्रेणीचे मंजुर असलेले एकमेव पद देखील रिक्त आहे. लघुलेखक निम्नश्रेणीच्या 10 मंजुर पदांपैकी तीनच पदे भरलेली असून सात पदे रिक्त आहेत. अव्वल कारकुनांची 205 पैकी 200 पदे भरली आहेत तर पाच पदे रिक्त आहेत. मंडळ अधिकारी 68 मंजुर पैकी 65 पदे भरली आहेत, तर तीन पदे रिक्त आहेत. लिपीकांची सर्वाधिक 108 पदे रिक्त आहेत. 325 जागांपैकी 217 पदे भरली आहेत. तर तलाठी पदांची देखील मोठया प्रमाणावर रिक्त पदे आहेत. त्यामुळे अनेक तलाठयाकडे अतिरिक्त पदभार आहेत. त्याचा परिणाम कामांवर होत असून जनतेची अनेक कामे प्रलंबित आहेत. 370 मंजुर असलेली तलाठयांच्या पदांपैकी 289 पदे मंजुर असून तब्बल 81 पदे रिक्त आहेत. तसेच वाहन चालकांच्या 28 मंजुर पैकी 18 पदे भरण्यात आली असू 10 पदे रिक्त आहेत. तर शिपाई/स्वच्छक/रखवालदारांच्या 180 मंजुर पदांपैकी 159 पदे भरलेली आहेत तर 21 पदे रिक्त आहेत.