जिल्ह्यात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर नवीन वर्षात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात येणार आहे. याचबरोबर  आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना १० जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार असून, सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
१६ जानेवारी २०२१ पासून देशाल कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातील ९४.३९ टक्के लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला असून, यापैकी ६७.९४ टक्के लाभार्थ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. मात्र सध्या जगात वाढत असलेले कोविड रुग्ण व आढळून येत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले असून, १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासोबत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांच्यासह ६० वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती, डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण सूचना
• ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड- १९ लसीकरण सुरु करावे व त्यांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करावा.
• हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना १० जानेवारी २०२२ पासून प्रिकॉशन डोस देण्यात यावा. प्रिकॉशन डोस देताना संबंधित लाभार्थ्याने दुसरा डोसच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असावे.
• ६० वर्षे वा वरील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंना त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांच्या सल्लयाने १० जानेवारी २०२२ पासून प्रिकॉशन डोस देण्यात यावा. प्रिकॉशन डोस देताना संबंधित लाभार्थ्यांने दुसरा डोसच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असावे.
• ६० वर्ष वा वरील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंना प्रिकॉशन डोस देताना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किंवा दाखवण्याची आवश्यकता नाही. फक्त अशा व्यक्तिंनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा.
• सर्व नागरीकांना शासकीय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मोफत लस देण्यात येईल. ज्या नागरीकांना खाजगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल अशा नागरीकांसाठी केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेले किंमतीमध्ये लसीकरण करता येईल. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सर्व नागरीकांना शासकीय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मोफत लस देण्यात येईल. ज्या नागरीकांना खाजगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल अशा नागरीकांसाठी केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेले किंमतीमध्ये लसीकरण करता येईल. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
डॉ.किरण पाटील- सीईओ,जि.प.

Exit mobile version