काँग्रेसची आक्रमक मागणी
| नागपूर। प्रतिनिधी ।
राज्यातील एक रुपया पीक विमा बंद करण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे. या योजनेत 350 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कृषी खात्यात भ्रष्टाचाराचा हा बीड पॅटर्न झाला असून धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना आणली होती, त्यावरून आपली पाठ थोपटून बीड पॅटर्नचा गवगवा केला होता. परंतु, या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली असल्याची माहिती मिळत आहे. विशेषत: या योजनेत शेतकर्यांच्या नावे बोगस अर्ज केल्याची प्रकरण समोर आल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये एकूण चार लाख अर्ज बोगस निघाले त्यातील एक लाखाहून अधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यात आढळले आहे , ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न असल्याची टीका काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्याचे खरेदीचे धोरण बदलले होते, त्याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच, बारामती येथील ऊस तोडणी हार्वेस्ट चालकांकडून सबसिडीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा आरोपदेखील वाल्मीक कराडवर झाला आहे, हे कराड मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे शेतकर्याची फसवणूकच सत्ताधारी करत असतील तर त्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. यासाठी धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी झाली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी यासाठी समिती नेमून लक्ष्य घातले पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
एक रुपया पीक विमा प्रकरणात आता बोगस अर्जावरून शेतकर्यांना शिक्षा देऊ नये. मंत्र्यांच्या सूचनेशिवाय योजनेत भ्रष्टाचार होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
– वडेट्टीवार, काँग्रेस नेते