कायमस्वरूपी ग्रामपंचायत अधिकारी कधी मिळणार?; नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय
| रसायनी | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडा येथे कायमस्वरूपी ग्रामपंचायत अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रशासकीय कामकाजाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे 72 हजार लोकसंख्या असल्याचे सांगण्यात येते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीत अधिकारीच नियमित उपलब्ध नसल्याने नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना विविध प्रशासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीकडे गटविकास अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून, नागरिकांना विविध दाखले, शासकीय योजनांशी संबंधित कागदपत्रे आणि इतर प्रशासकीय कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागते. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळविताना विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, कार्यालयात ग्रामपंचायत अधिकारी उपलब्ध नसल्यास नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीत नियमित अधिकारी उपलब्ध असणे ही केवळ प्रशासकीय गरज नसून नागरिकांच्या दैनंदिन कामांसाठी आवश्यक बाब आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत अधिकारी वैशाली जाधव यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, त्यांनीही गटविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या कार्यालयात येत नसल्याचा दावा करण्यात येत असल्याने ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. या परिस्थितीत ग्रामपंचायतीचा नियमित कारभार कोण सांभाळत आहे? नागरिकांची प्रलंबित कामे कोण मार्गी लावणार? कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी प्रशासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रामपंचायतीतील प्रशासकीय अडचणींचा परिणाम विकासकामांवरही होत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या चार महिन्यांपासून ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकासकामे थांबल्याचा दावा काही सदस्यांकडून करण्यात येत आहे. तसेच यापूर्वी केलेल्या कामांची बिले रखडल्याची तक्रारही काही सदस्यांनी केली आहे.
गेल्या अडीच वर्षांत कोकण विभाग, राज्य आणि केंद्र स्तरावर शासकीय पुरस्कार मिळविल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या विकासाला आता प्रशासकीय अडचणींमुळे खीळ बसली आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायतीला नियमित अधिकारी उपलब्ध करून द्यावा, नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत आणि विकासकामांच्या सद्यस्थितीबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत वासांबे करिता वरिष्ठांकडून नव्याने ग्रामपंचायत अधिकारी येणार असल्याचे समजते. परंतु, अद्याप स्पष्ट नाही. या ग्रामपंचायतीत सोमवारी (दि.19) पासून वेळेवर ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहील.
संदिप कराड
गटविकास अधिकारी, खालापूर पंचायत समिती
आम्हाला ग्रामपंचायतीत शासकीय योजनांशी संबंधित कागदपत्रे आणि इतर प्रशासकीय कामासाठी ग्रामपंचायतीत आलो असता ग्रामपंचायत अधिकारीच जागेवर नसल्याने दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
सुज्ञ नागरिक







