नैनाच्या विरोधात गावबंद आंदोलनास प्रारंभ

सुकापूरमध्ये कडकडीत बंद
प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आक्रमक

| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्यांना देशोधडीला लावणार्‍या सिडकोच्या नैना प्रकल्पाला हद्दपार करण्याचा निर्धार प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी केला आहे. या करिता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून रविवारी 12 फेब्रुवारीपासून पनवेल तालुक्यात गाव बंद आंदोलन सुरु करण्यात आले.पहिल्याच दिवशी सुकापूर येथे कडकडीत बंद पाळून सिडकोला खणखणीत इशारा देण्याचा मानस नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीला यश आले.

आता संपूर्ण महिनाभर गावबंद आंदोलन सुरु राहणार आहे.सुकापूर येथे नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांशी माजी आ.बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरात, नैना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीते अ‍ॅड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष वामन शेळके, सचिव राजेश केणी, शेखर शेळके, नामदेवशेठ फडके, सुभाषशेठ भोपी,अनिल ढवळे आदींनी संवाद साधत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नवी मुंबई, पनवेल, उरण मधील 270 पेक्षा अधिक गावे विमानतळ बाधित म्हणून अधोरेखित केली गेली आहेत. येथील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी नियोजित शहर वसविण्याच्या प्रयत्नात सिडको फुटकी कवडी देखील न देता शेतकर्‍यांच्या जमिनीवरील मलिदा लाटण्याचा प्रयत्न करत आहे. भूमी धारकांची हक्काची जमीन कायमस्वरूपी अधिग्रहित करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव उधळण्याकरता समितीने कंबर कसली आहे. नैना प्रकल्प बाधित गावांच्यापैकी रोज एक गाव बंद करून सिडको प्रशासनाला खणखणीत इशारा देण्यात येणार आहे.- बाळाराम पाटील, माजी आमदार

सुकापुर गाव बंद आंदोलनाला नागरिकांनी, व्यापार्‍यांनी, रिक्षाचालक, टेम्पोचालक बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि 100% सुकापुर बंद करून नैना प्राधिकरणाचा निषेध व्यक्त केला. यावेळेस आमदार बाळाराम पाटील यांनी मार्गदर्शन करताना कोणत्याही स्वरूपात शेतकरी बांधवांवर येथील फ्लॅटधारकावर अन्याय होऊ देणार नाही ही भूमिका मांडली. नयना प्रशासन मोफत 60 टक्के घेऊन शेतकरी बांधवांवर जो अन्याय करतोय ही दडपशाही सहन केली जाणार नाही आणि शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष चालू राहील अशा पद्धतीचा संदेश बाळाराम पाटील साहेबांच्या वतीने देण्यात आला.

राजेश केणी यांनी आपल्या मनोगतामध्ये सुकापुरच्या पुनर्विकासाचा मुद्दा ठळकपणाने घेतला नाहीनाच्या उदासीन धोरणामुळे लोकांचे बळी जायची वेळ आली आणि आज जरी आम्ही शांतता मार्गाने गाव बंद केला असेल तरी पुढील काळामध्ये आम्ही लढायचं स्वरूप बदलायला मागेपुढे राहणार नाही.. ही भूमिका मांडली अनिल ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुकापुर इतर सुरुवात आहे पनवेल तालुक्यातील नयना प्रकल्प बाधित सर्व गाव रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला. वामन शेठ शेळके यांनी सुद्धा संपूर्ण पनवेल तालुका या लढ्यामध्ये सहभागी असल्याचे सांगितले.

Exit mobile version