| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारुविरोधी मोहिमेचाच एक भाग म्हणून पो.नि. तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्यातील पथकाने नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील चेराटी जंगल परिसरात शनिवारी (दि.28) सकाळी 10.30 वा. च्या सुमारास धाड टाकली. यावेळी गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
नागोठणे पोलिसांच्या या धाडीत एका ठिकाणी एक प्लास्टिकच्या ड्रममधील रु. 40 प्रतिलीटर दराचे व एकूण रु. आठ हजार किमतीचे 200 लीटर गुळमिश्रित रसायन मिळून आले. तसेच दुसर्या ठिकाणी दोन लोखंडी टाक्यांमधून रु. 40 प्रतिलीटर दराचे व एकूण रु. 16 हजार किमतीचे साधारण 400 लीटर गुळमिश्रित रसायन मिळून आले. असे एकूण रु. 24 हजार किमतीचे 600 लीटर गूळमिश्रित रसायन नागोठणे पोलिसांना सापडले. हा मुद्देमाल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने हा मुद्देमाल जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. परेश मोरे, पो.शि. रामनाथ ठाकूर, पो.शि. सत्यवान पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.