। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतमधील शेलू गावातील गाव तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. या गाव तलावाच्या आजूबाजूला झालेल्या रहिवाशी इमारतीतून निघणारे सांडपाणी अस्ताव्यस्त पसरते. त्यामुळे तलाव दूषित झाला आहे.
शेलू ग्रामपंचायतमध्ये गाव तलाव असून साधारण पाच एकर जमिनीमध्ये वसलेल्या या गाव तलावातील गाळ काढण्याचे काम मागील तीन वर्षापूर्वी करण्यात आले होते. त्यानंतर या तलावाच्या कडेला बसून स्थानिक ग्रामस्थ संध्याकाळच्या वेळी निवांत वेळ व्यतीत करतात. तलावाच्या कडेला जगवलेली झाडे हीदेखील सावली देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे हा गाव तलाव स्थानिक ग्रामस्थांसाठी सकाळी आणि सायंकाळ वेळी हक्काचे मनोरंजन आणि विश्रांतीचे स्थान निर्माण झाले होते. मात्र, या तलावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात निवासी संकुले इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होऊन शेलू ग्रामपंचायतीचा गाव तलाव प्रदूषित झाला आहे.
आजूबाजूच्या रहिवाशी संकुले यातील सांडपाणी गाव तलावात आल्यामुळे तलावामधील पाणी पिवळे झाले आहेत. तलावातील पाण्यावर हिरवे तवंग दिसून येत आहे. त्यामुळे पाण्यात सतत डुंबत असलेली जनावरेही पाणी प्रदूषित झाल्याने पाण्यात जात नाहीत. तसेच पाण्यात जाणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर खाज येण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे शेलू ग्रामपंचायतमधील गाव तलाव वापराविना बनला आहे. त्यामुळे शेलू गाव तलाव पुन्हा प्रदूषणविरहित व्हावा यासाठी लोकसहभागाची गरज निर्माण झाली आहे.