आरोपींना ग्रामस्थांकडून चोप, पोलिसांकडून अटक
। धाटाव । वार्ताहर ।
रोहे तालुक्यात धामणसई गावाच्या हद्दीत शनिवारी अघोरी प्रकार उघडकीस आला. पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने जादुटोणा करण्याचा प्रकार ग्रामस्थांनी हाणून पाडला. बौद्धवाडी शेजारील स्मशानभूमी व लहान मुलांच्या शाळेत फुले, अबिर गुलाल, लिंबू, टाचणी असल्याचे प्रारंभी काही ग्रामस्थांना दिसून आले. त्यातच दोन अनोळखी व्यक्तींना काहीतरी अमानुष अघोरी विद्या, जादूटोणा करताना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडले आणि चांगलाच दम दिला. त्याच झटापटीत काहीजण पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अघोरी जादूटोणा करणार्यांत अनेकजण रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत, ते पैशाचा पाऊस पाडणार होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. त्याच अनुषंगाने पोलीस तपास करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले आहे, तर अघोरी विद्या, जादूटोणा गुन्ह्याखाली संबधीत आरोपींना रात्रौ उशिरा अटक करण्यात आल्याची माहितीही पोलीस प्रशासनाने दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सहा अनोळखी इसम कोलाड विभागातील व्यक्तीसोबत धामणसईतील स्मशानभूमी व शाळेत अघोरी विद्या करत असल्याचा संशय काही ग्रामस्थांना आला. माऊली कृपा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत विचित्र पूजाअर्चा करीत असल्याने हे संशयित लोक ग्रामस्थांच्या कचाट्यात सापडले. त्यांना विचारणा केली असता सर्वजण अक्षरश: भांबाहून गेले. आता आपली सुटका नाही, असे दिसतात काहींनी धूम ठोकत पळ काढला. त्यातील चार आरोपींना ग्रामस्थ विजय जाधव व ग्रामस्थांनी रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले. अघोरी विद्या करणार्यांतील म्होरक्या पळून गेला, असे ग्रामस्थ विजय जाधव यांनी सांगत कदाचित नरबळीसारखा भयानक प्रकार घडला असता, ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा अघोरी प्रकार उघडकीस आला, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ विजय जाधव यांनी दिली आहे.
पैशाचा पाऊस पाडणार होते ? अशी चर्चा आता तालुक्यासह संबंध जिल्ह्यात सुरू आहे. त्याचदृष्टीने रोहा पोलिसांनी तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले. अमानुष व अघोरी प्रथा जादूटोणा विद्याप्रकरणी आरोपी संतोष पालांडे ,प्रदीप पवार ,प्रवीण खांबल,सचिन सावंतदेसाई ,दीपक कदम ,मिलिंद साळवी सर्व रा. रत्नागिरी, राजेंद्र तेलंगे रा. हेटवणे व इतर अनोळखी 2 व्यक्तींविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व आघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करणे, समूळ उच्चाटन करणे अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.