जत्रेचा मंच बनला आंदोलनाचा आवाज
| तळा | प्रतिनिधी |
बारपे गावात सुरू असलेल्या खडी क्रशर प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे. महागाव येथील वरदायीनी देवी जत्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हातात बॅनर घेऊन शांततापूर्ण पण ठाम विरोध दर्शवला. गेल्या काही महिन्यांपासून तळा तालुक्यातील बारपे गावातील परिसरात सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे धूळ प्रदूषण, आवाजाची समस्या आणि शेतीवर होणारा परिणाम याबाबत ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे. स्थानिकांच्या मते, या प्रकल्पामुळे पिकांचे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.
गावातील पारंपरिक जत्रेत मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, याच संधीचा फायदा घेत ग्रामस्थांनी आंदोलन उभारले. खडी क्रशर बंद करा, आरोग्याला प्राधान्य द्या, शेती वाचवा खडी क्राशर हटवा, खडी प्रोजेक्ट विनाश प्रोजेक्ट ही माती आमची आई आहे आईचा श्वास घोटणारा क्रशर आम्हाला मान्य नाही, आई सोमजाई, आई वरदायीनी देवी आमच्या पूर्ण गावाचा विरोध असताना आपल्या भागात एक विनाशकारी स्टोन क्रशरचा प्रकल्प होत आहे, तो प्रकल्प मुळासकट बंद व्हावा यासाठी आम्हाला बळ दे अशा घोषणांचे बॅनर घेऊन ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी सांगितले की, अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे जत्रेसारख्या सार्वजनिक कार्यक्रमातून प्रश्न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. काही नागरिकांनी असा आरोप केला की, संबंधित प्रकल्पाला परवानगी देताना स्थानिकांचा विचारच करण्यात आलेला नाही.तहसील कार्यालयाकडून अनाधिकृत उत्खनन बाबतीत संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या नोटीस जारी केल्या गेल्या परंतु अजूनही कुठली ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.खडी क्रशरचे काम सुरूच आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी या आंदोलनाचा पर्याय निवडला आहे. याबाबतीत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.मात्र ग्रामस्थांनी जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनाला आता राजकीय स्वरूपही येण्याची शक्यता आहे.
वरदायीनी देवी जत्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आ.अनिकेत तटकरे यांनी भेट दिली या भेटी दरम्यान आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी तटकरे यांची भेट घेऊन खडी क्रशर विरोधात बाबत ग्रामस्थांची भूमिका मांडली व आगामी काळात हा मुद्दा अधिक तीव्रतेने मांडण्यात येईल आंदोलन देखील मोठे होणार असल्याचे सांगितले तटकरे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे एकूण घेतले आहे त्यामुळे एकूणच, बारपे येथील खडी क्रशरविरोधातील आंदोलन आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार असून, यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरोग्यावर परिणाम
बारपे गावातील परिसरात सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे धूळ प्रदूषण, आवाजाची समस्या आणि शेतीवर होणारा परिणाम याबाबत ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे. स्थानिकांच्या मते, या प्रकल्पामुळे पिकांचे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.







