। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायत हद्दीत अधिकृत व अनधिकृत बांधकामाचा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. अधिकृत बांधकाम कोणते व अनधिकृत बांधकाम कोणते यावरून जसखार गावात द्वेषाचे राजकारण पाहायला मिळत आहे. समोरच्याने गाय मारली म्हणून आपण वासरु मारणे अशा म्हणीप्रमाणे विरुद्ध सदस्यांवर याचिकाकरुन गावाचे भविष्य धोक्यात घालू इच्छित नाही. याबाबीवर व निकालावर जसखारवासियांनी चिंता व चिंतन करावे, असे विचार काशिबाई ठाकूर यांनी व्यक्त केले होते. मात्र, त्यांच्यावरच आता चिंतन करण्याची वेळ आली आहे. तेच आता या म्हणी प्रमाणे वागत असल्याचा आरोप युवा सामाजिक संस्थेने व ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी सरपंच काशीबाई ठाकूर यांनी रत्नेश्वरी मंदिर परिसरातील जमिनी मोजमाप करण्यासाठी भूमी अभिलेखच्या अधिकार्यांना बोलाविले होते. मात्र, युवा सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. या सर्व पार्श्वभूमीवर काशीबाई ठाकूर यांच्या या कार्य पद्धतीचा जसखारच्या ग्रामस्थांनी व युवा सामाजिक संस्थेने तीव्र निषेध केला आहे.