माणगाव-म्हसळा रोडवरील झाडांचे संरक्षण
| माणगाव | प्रतिनिधी |
कोकणच्या निसर्गसौंदर्याचे जतन व्हावे, हिरवळ टिकून राहावी आणि सुंदर कोकण ही ओळख अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने मंगळवारी (दि.13) माणगाव-म्हसळा रोडच्या दुतर्फा राबविण्यात आलेला वृक्षसंरक्षण व स्वच्छता उपक्रम नागरिकांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारा ठरला.
रस्त्याच्या कडेला यापूर्वी लावलेली अनेक झाडे कालांतराने तुटली होती. मात्र, शासनामार्फत दोन्ही बाजूंनी नव्याने लावण्यात आलेली झाडे सध्या उत्तमरीत्या वाढत आहेत. असे असतानाही मोर्बे व डोंगरोली परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे ही झाडे जळून जाण्याचा धोका कायम असल्याने, या भूमीसाठी काहीतरी केले पाहिजे, या जाणीवेतून मोर्बे, डोगरोली आणि साई या ग्रामपंचायती पुढे आल्या. या उपक्रमाचे नेतृत्व कोकणचे सुपुत्र, पर्यावरणप्रेमी शौकत रोहेकर यांनी केले. त्यांना राजू मोरे, ग्रामसेवक करडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांची भक्कम साथ लाभली. तसेच साई ग्रामपंचायतीचे विठोबा मोरे, प्रवीण अधिकारी, रविंद्र अधिकारी, धनाजी येलवे, गफार सोलकर, विष्णू कालप व गावातील महिलांनीही प्रत्यक्ष श्रमदान करून झाडांभोवतालची साफसफाई केली.
झाडांच्या संगोपनासाठी अल्ताफ धनसे, अब्दुला महंमद शरीफ हर्णेकर, सैफुल्ला जळगावकर तसेच मोर्बे-साई-डोंगरोली परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. माणगाव ते साई या मार्गावर लावलेली झाडे सामाजिक माध्यमे, लोकसहभाग आणि सततच्या देखरेखीच्या माध्यमातून नक्कीच जगवली जातील, असा विश्वास सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी वनविभागाचे शिंदे, मोरे, सुभेदार, पिंगळा व इतर कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचे आभार मानत, ही वाढलेली झाडे तुमच्या गावाची संपत्ती आहेत. त्यांचे जतन करणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन केले.
