शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार
| नवी मुंबई | प्रतिनिधी ।
विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनामध्ये शेकडो हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, मोबदल्याची रक्कम अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत एक बैठक पार पडली असून, शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू केली जाणार आहे.
अनेक शेतकऱ्यांना 2024च्या दरम्यान मोबदल्याचे पैसे मिळाले आहेत; परंतु गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत प्रशासकीय अडचणीमुळे उर्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला वाटपाचे काम थांबले होते; मात्र आता मोबदला वितरणाचे काम सुरू होत असताना मोबदला रक्कम मात्र कमी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होता.
या विषयात आमदार विक्रांत पाटील यांनी स्वतः लक्ष घालत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या भावना मांडताना विक्रांत पाटील यांनी विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉरसाठी पूर्वी 50% मोबदला दिला गेला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनासुद्धा तेवढीच रक्कम अथवा शक्य असल्यास जास्तीचा मोबदला देण्याची मागणी केली होती.
न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ
पुणे येथील जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने पूर्वीचा मोबदला वाटप सुरू झालेल्या प्रकल्पांना लागू होतात का, याची खात्री करावी. तसेच विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉर हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, सर्व शेतकरी योग्य मोबदला घेण्यास तयार असताना मोबदला कमी झाल्याने अडचणी तयार होत आहेत. त्यामुळे योग्य तो निर्णय करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.







