। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर राहणारी आणि बारावीपर्यंत कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस न लावणारी प्रतीक्षा प्रभाकर माळी ही विद्यार्थिनी नॅशनल एलिजिब्लिटी परीक्षेत 97.91 टक्के गुणांसह देशात अव्वल आली आहे. दरम्यान, तिच्या या कर्तृत्वाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून, राष्ट्रीय रिसर्च फेलोशिपसाठी तिने आपले नामांकन निश्चित केले आहे.
कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायतमधील मालेवाडी हे गाव कर्जत या तालुक्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. प्रतीक्षा प्रभाकर माळी ह्या सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आपल्या गावाच्या जवळच असलेल्या गौळवाडी माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत आणि तेथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत पहिली आली. तोपर्यंत शिकवणी किंवा ट्युशन काय असते हे प्रतीक्षाला माहिती नव्हते. कर्जत येथील कोकण ज्ञानपीठच्या महाविद्यालयात बी कॉम आणि नंतर एम कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणार्या प्रतीक्षा माळी हिने नंतर महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा दिली. 2021 मध्ये झालेल्या राज्य पात्रता परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर प्रतीक्षाने राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नॅशनल एलिजिब्लिटी टेस्ट देण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत ग्रामीण भागातील या तरुणीने देशात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. तिने तब्बल 97.91 टक्के गुण मिळावीत भारतात टॉपर येण्याचा मान मिळविला आहे. त्याचवेळी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी आपले नामांकन निश्चित केले आहे.
ग्रामीण भागात राहणारी परंतु ध्येयाने झपाटलेल्या प्रतीक्षा माळी या विद्याथीनीमुळे कर्जत तालुक्याची मान उंचावली आहे.राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार करणारी प्रतीक्षा कर्जत तालुक्यातील एकमेव असून, तेथे देशात टॉपर राहण्याचा मान मिळविल्याने कर्जत तालुक्याची शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत आहे.