| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांस शिक्षणाव्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) या कामाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हे काम घरोघरी जाऊन या पद्धतीने करायचे असून, यासाठी लागणारा वेळ आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असते. एका बाजूने ‘पढेगा इंडिया, तो बढेगा इंडिया’चा नारा दिला जात असून, दुसरीकडे मात्र शिक्षकांवर वाढत असलेली जबाबदारी यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पूर्ण वेळ द्या, असे भावनिक निवेदन तहसीलदार आयुब तांबोळी यांना देण्यात आले.
मराठी शाळा दिवसेंदिवस बंद पडत चालल्या आहेत. मात्र, त्यामध्येही शिक्षक आपल्या बुद्धीमत्तेवर पालकांस मराठी शाळेचे महत्त्व समजावून सांगत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येताना जणू तारेवरची कसरत करावी लागत असते. मात्र, यासाठी पालकसुद्धा काही वेळा सकारात्मक विचार करून पाठवित असतात. मात्र, शिक्षकांवर वाढत जात असलेल्या जबाबदारीमुळे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष राठोड व यांच्या माध्यमातून या कामातून मुक्ती मिळावी म्हणून विनंती करण्यात आली.
या कामातून शिक्षकांना कसे मुक्त करता येईल व पर्यायी व्यवस्था कोणती वापरता याबाबत गटविकास अधिकारी खालापूर यांच्यासोबत शिक्षकांनी चर्चा करुन योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना परिस्थितीत शाळाबाह्य सर्वे, नवभारत साक्षरता अभियान निरीक्षर सर्वेसोबतच यू-डायसची कामे, शाळांची कामे, विज्ञान प्रदर्शन आदी कामे सोपवण्यात आली आहे. आरटीआयनुसार, मुलांना पूर्णवेळ शिक्षक शाळेत उपस्थित राहण्याची अट कायम असताना आरटीआय 24 अ नुसार शिक्षकांना शाळाबाह्य कामे न देणे असे तरतूद असतानासुद्धा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना निवडणुकीची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जे जबाबदारी देऊन त्यात सतत कार्यालयाकडून दबावाला बळी पडत जावे लागत असल्यामुळे मुले कशी शिकणार, असा प्रश्न सध्या शिक्षकांना पडत आहे.