। मेलबर्न । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या पार्थिवावर 30 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती व्हिक्टोरिया राज्यातील शासनाचे प्रवक्ते डॅनिएल अँड्र्यू यांनी दिली. शुक्रवार, 4 मार्च रोजी थायलंडमधील कोह सामुई येथे 52 वर्षीय वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नचे पार्थिव सध्या बँकॉक येथे असून पुढील काही दिवसांत ते ऑस्ट्रेलियात दाखल होईल. वॉर्नवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून या वेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरही उपस्थित असतील.
मेलबर्नला होणार्या अंत्यसंस्कारापूर्वी वॉर्नचे कुटुंबीय खासगीत त्याला आदरांजली वाहणार आहे. मेलबर्नमध्येच जन्मलेल्या वॉर्नने 1994 मध्ये येथे हॅट्रिटक मिळवली होती. त्याशिवाय कसोटी कारकीर्दीतील 700 बळींचा टप्पाही त्याने 2006मध्ये याच मैदानावर गाठला. एमसीजीबाहेरच वॉर्नचा पुतळा उभारण्यात आला असून लवकरच एका स्टँडलाही त्याचे नाव देण्यात येणार आहे.