अधिकार्‍यास अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकार्‍याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार याच कंपनीत काम करणार्‍या महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत कॅमलिन कंपनीच्या अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तो अद्याप मोकाट असल्याने त्याला अटक व्हावी यासाठी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्यावतीने रसायनी पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे. कंपनीमधील अधिकारी दिलीप तायडे हा गेल्या काही महिन्यांपासून पीडित महिलेला मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता. दमदाटी करून पीडित महिलेला गप्प केले जात असे. तायडेच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर पीडित महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. परंतु, दिलीप तायडे याला व्यवस्थापनाने निलंबित करावे, तसेच त्याला रसायनी पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

Exit mobile version