30 हजार नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाण्याचा साठा कमी होत आला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, पेण या तीन तालुक्यांत पाण्याचा दुष्काळ सुरु झाला आहे. 30 हजार 442 नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून 21 टँकरची सुविधा करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्याची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 26 लाख असून, जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक गावांचा समावेश आहे. गावांतील लोकसंख्या 16 लाख 64 हजारांहून अधिक असून, लघु पाटबंधारे व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत असलेल्या धरणांबरोबरच विहिरी, बोअरवेलद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, जिल्ह्यात तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळीदेखील कमी होऊ लागली आहे. धरणांनीदेखील तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट जिल्ह्यातील गावांमध्ये सुरु झाले आहे. तीन ते पाच दिवस पाण्याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहेत. काही गावांमध्ये पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नाही. त्यामुळे अनेकांना पाणी विकत आणावे लागत आहे.
जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्यांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. दोन ते तीन किलो मीटर प्रवास करीत पाणी आणावे लागत आहेत. जिल्ह्यात सध्या अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. आतापासूनच पाण्यासाठी नागरिकांना विशेष करून महिलावर्गांना पायपीट करावी लागत आहे. काहीजण रात्रभर जागून पाणी भरत आहेत, तर काही जण भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अलिबाग, पेण व पनवेल तालुक्यातील 58 ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामध्ये 14 गावे व 44 वाड्यांचा समावेश आहे. या तीन तालुक्यांतील 30 हजार 442 नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने टँकरचा आधार घेतला आहे. 21 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
सरकारी टँकर गायब
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सरकारी टँकरची सुविधा उपलब्ध केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील सरकारी टँकर कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून खासगी टँकरचा आधार घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे सरकारचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जलजीवनच्या आडात पाणीच नाही
प्रतिव्यक्ती 55 लीटर पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन योजना सुरु करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली. या योजनेसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्यांमध्ये विहिरी, पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या. त्यामुळे पाण्याची समस्या सुटण्याची आशा रायगड जिल्ह्यातील नागरिकांना होती. मात्र, तो फोल ठरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यामध्ये जानेवारीपासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जलजीवन योजनेंतर्गत कामे करूनही आडात पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.