। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून पावसाचा इशारा असताना मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थान मंदिरात रविवारी (दि.5) रात्री पाणी शिरल्याची घटना घडली.
याबाबत जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली यांनी रविवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी कृषीवल प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मंदिराच्या पूर्व दिशेला असलेला ओढा नगरपंचायतीच्या विनंतीवरून साफसफाई करण्यात आली होती. मात्र, ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे तो ओढा पूर्णपणे ओसंडून वाहू लागला. साधारण आरतीच्या वेळी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी मंदिरात चिखलयुक्त पाण्याने प्रवेश केला. मात्र, देवस्थानच्या कर्मचारी आणि स्थानिक दुकानदारांच्या मदतीने केवळ 30 ते 40 मिनिटांत सर्व पाणी बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मंदिर तात्काळ स्वच्छ करून भाविकांसाठी दर्शनासाठी पूर्ववत खुले करण्यात आले आहे, असेही गद्रे यांनी सांगितले. त्यानंतर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी ये-जा सुरळीत सुरू आहे. प्रशासनाने ही परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.







