| उरण | वार्ताहर |
गेले तिन आठवडे सातत्याने पडलेल्या दमदार पावसामुळे रानसई धरण ओव्हरफ्लो झाले असल्याची माहिती एमआयडीसी उरण कार्यालयाचे उपअभियंता रवींद्र चौधरी यांनी दिली आहे. त्यामुळे अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेले उरणचे रानसई धरण उरणच्या जनतेबरोबरच राष्ट्रीय प्रकल्पाची तहान भागविण्यासाठी सज्ज झाले आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असणारे रानसई धरण सन 1960 उरण तालुक्यातील नौदलाच्या शस्त्रागारासाठी बांधण्यात आले होते. या धरणाला 62 वर्षे पूर्ण होत आहेत. नौदलाच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळत असताना पुढे तालुक्यात निर्माण झालेल्या अन्य राष्ट्रीय प्रकल्प तसेच उरण शहराबरोबर तालुक्यातील 25 गावांना या धरणामधून पाणीपुरवठा करण्यात येतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या आणि नैसर्गिक पाणलोटक्षेत्र असलेल्या या धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता 10 एम.सी.एम. (एक हजार कोटी लीटरपेक्षा अधिक) आहे.
धरणातील वाढत्या गाळामुळे पाण्याचा साठा कमी होत गेला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणातून साठवणूक क्षमतेइतकेच पाणी वाया जाऊन समुद्रात जाते. या पाण्याचा कशासाठीही उपयोग होत नाही. शासन एकीकडे पाणी अडवा पाणी जिरवा अशा मोहिमा राबून त्याच्यावर करोडो रुपये खर्च करते, परंतु अशा पाणीसाठ्यावर खर्च करण्यासाठी शासनाकडे निधी नसणे, ही शोकांतिका आहे.