। रोहा । प्रतिनिधी ।
शेणवई ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात माजी आमदार पंडीत पाटील यांनी कामाचे श्रेय लाटण्यार्यांवर घणाघाती टीका करत, आम्ही आमच्याचा कामाचे श्रेय घेतो, इतरांच्या कामाचे नाही, असे प्रतिपादन केले आहे. याप्रसंगी शिवसेना पुढार्यांच्या खोटेपणाला शेकापची चपराक बसली असून, त्यांचा पर्दाफाश झाल्याने भातसई विभागातील स्थानिक सेना नेत्यांची बोलती बंद झाली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील तसेच माजी आमदार पंडीत पाटील यांच्या पुढकाराने शेणवई ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी माजी सरपंच रूपाली मढवी यांनी मंजूरी मिळविली होती. मात्र, सेनेच्या स्थानिक नेत्यांनी संबंधित कामाच्या कार्यारंभाचे कोणतेही आदेश नसतानादेखील नारळ वाढवून कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेकाप फक्त विकासकामांचे श्रेय लाटते, प्रत्यक्षात काहीच नाही वगैरे असा अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्नदेखील करण्यात आला. मात्र, याच्यावर सडेतोड उत्तर भूमिका घेत, दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेकाप नेते पंडीत पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेते व्ही.टी.देशमुख, रोहा पंस सभापती गुलाब वाघमारे यांच्या उपस्थितीत सर्वांसमक्ष कामाचे कार्यारंभ आदेश दाखवत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा नारळ फोडून शेकापने कामाचा शुभारंभ केला.
याप्रसंगी, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या विभागात येऊन 26 गाव पाणी प्रश्नावरून राजकारण करणार्या मंडळीना मागील दोन वर्षांत पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही.सदर योजना सुरळीत कार्यान्वित करून भातसई विभागातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचावे, यासाठी मंजूर करण्यात आलेला साडे पाच कोटी रुपयांचा निधी अद्याप खर्च झालेला नाही. सदर विलंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शेकापने प्रशासनाला जाब विचारला असून दिवाळी नंतर याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास शेकाप रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून देईल, असा इशारा देखील पंडीत पाटील यांनी दिला.
शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी यांनी, महिनाभरापूर्वी डोंगरी येथे शेकापच्या माध्यमातून होत असलेल्या पाणी योजनेच्या कामाच्या शुभारंभाचा नारळ फोडून स्थानिक सेना कार्यकर्त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. विरोधकांनी कामे मंजूर करून घेऊन पूर्ण करावीत. पण इतरांच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करणे, हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन केले. याशिवाय, शेणवई ग्रामपंचायत हद्दीत मागील 20 वर्षात शेकापच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.
या कार्यक्रमाला कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी, माजी बाजारसमिती सभापती अभिशेठ देशमुख, हेमंत ठाकूर,गणेश मढवी, हरेश म्हात्रे, लियाकत खोत, संदेश विचारे, गोपीनाथ गंभे, राम गिजे, भारत पाटील, दत्ताराम मोरे, उपसभापती पांडुरंग ठाकूर, गणेश खरीवले, दिलीप म्हात्रे, रत्नदीप चावरेकर, सदानंद शेळके, युवा अध्यक्ष जीवन देशमुख, शशिकांत कडू, अमोल शिंगरे, चंद्रकांत झोरे,खेळू ढमाल, विनायक धामणे, सुरेश कोतवाल यांच्यासह शेणवई ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेणवई येथील ज्येष्ठ सामाजिक नेते व्ही.टी.देशमुख यांनी या कार्यक्रमात आपली हजेरी लावून गावात होणार्या विकासकामांमध्ये राजकारण करणार्यांना मार्मिक शब्दात चिमटे काढले. तसेच चांगल्या दर्जाचे ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकाम कामाजासाठी शुभेच्छा दिल्या.
गावाच्या विकासासाठी विरोधकांनी जरूर निधी आणावा. आम्ही त्याचे स्वागत करू. पण शेकापच्या अंगावर येऊ पाहणार्याना त्यांची जागा देखील दाखवून देऊ.
पंडीत पाटील, शेतकरी कामगार पक्ष