चालकांची नाराजी; मोठ्या अपघाताची शक्यता
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील गांरबी रस्ता हा अनेक वर्षे नव्याने न बनल्याने या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेत. या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असल्याने चालकांनी नाराजी दर्शवली आहे. तालुक्यातील सर्व रस्ते नव्याने बनत आहेत. पण गांरबी रस्ताला मुहूर्त कधी, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून होत आहे.
मुरुड-केळघर मार्गे रोहा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा व कमी अंतराचा असल्याने या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने ठीक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हा रस्ता जागोजागी खड्डेमय झाल्याने लोकांना व वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता नागशेत, गांरबी, पारंगान, धनगरवाडी, गोपाळवटपर्यंत खराब झाला आहे. निदान रस्ताला पडलेले खड्डे तरी बुजवा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
तसेच, मुरुड शहरात विकासाची गंगा वाहत आहे. परंतु, पंचक्रोशी भागातील रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मुरुड-केळघर रस्तावरचे खड्डे बुजावावे व रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडांमुळे होणारे अपघात टाळावे याकरिता 8 गावाच्या ग्रामस्थांच्यावतीने मुरुड उपअभियंता बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन (दि.16) फेब्रुवारी रोजी देण्यात आले होते. आज चार महिने होऊन सुध्दा या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. यामुळे रस्तावरील खड्डे वाढत गेले. हे खड्डे पावासाळात धोकादायक होऊन याठिकाणी जीवघेणा प्रवास घडु शकतो. तरी लवकरात लवकर रस्तावरील खड्डे बुजावावेत व येणार्या पर्यटकांना तसेच स्थानिकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी नागरिकांमधून होत आहे. यावेळी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास चव्हाण कृषीवलच्या प्रतिनिधीनीशी संवाद साधत म्हणाले की, मुरुड-केळघर रस्ता हा पर्यटकांच्यां दृष्टीने महत्वाचा आहे. पण या रस्त्याची अवस्था दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तरीपण सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन रस्तावरील पडलेले मोठं मोठे खड्डे बुजावावेत. नाहीतर पावासात हेच खड्डे अजुन मोठे होऊन या ठिकाणी मोठा अपघात घडु शकतो.
या रस्त्याची टेंडर प्रोसेस झाली होती. परंतु, या रस्त्याकरिता एकाने टेंडर भरल्याने पुन्हा री कॉल करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता नव्याने बनु शकला नाही. तसेच, दोन दिवसांत रस्तावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करु.
रमेश गोरे,
उपअभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग