| उरण | वार्ताहर |
उरण परिसरात एलईडी प्रकाशझोतात मासेमारी जोरात सुरू आहे. याकडे मत्स्यविभागाचे अधिकारी कारवाई करीत नसल्याची धक्कादायक माहिती छोटे मासेमारी करणार्या मच्छिमार बांधवांनी दिली आहे.
रायगडसह रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यात दादली पद्धतीने मासेमारी प्रचलित आहे. एलईडी आणि पर्सनेट मासेमारीमुळे पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणार्यांना मासळी गवसत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आधुनिक तंत्राद्वारे समुद्रात रात्री मोठ्या विद्युत प्रकाशझोतात मासळीला आकर्षित केली जाते. त्यामुळे स्थानिक मच्छिमार खोल समुद्रात जाऊनही अपेक्षित मासळी मिळत नसल्याची तक्रार आहे. समुद्रात मासळी मिळत नसल्याने बहुतांश होड्या नांगरून ठेवल्या जात आहेत. बेकायदेशीर मासेमारीवर कोणी कारवाई करायची, याबाबत सुसूत्रता नसल्याने चालढकल केली जात आहे. त्यामुळे कडक कारवाई कधी आणि कोण करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा बेकायदेशीर मासेमारीवर त्वरित निर्बंध शासनाने आणून न्याय द्यावा, अशी मागणी मच्छिमारांकडून सरकारकडे मागणी केली जात आहे.