मध्य रेल्वेचे कर्जत कसाराकडे दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबईचे उपनगर म्हणून विकसित झालेल्या कर्जतकडे येणार्या उपनगरीय लोकल गाड्यांची संख्या मागील 14 वर्षे वाढली नाही. आता निवडणुकीत रणधुमाळीत नागरिक लोकलची फेर्या वाढविण्याच्या घोषणा उमेदवार करीत आहेत. मात्र, कर्जत आणि कसारा लोकलच्या संख्येत वाढ होत नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन उपनगरीय विभागातील प्रवाशांच्या अडचणी आणि असमाधानाचा मुद्दा सतत मांडला जातो. जे अलीकडील वेळापत्रक बदल आणि अन्य संरचनात्मक समस्यांमुळे उद्भवले आहेत. या बदलांमध्ये प्रवाशांच्या सोयीपेक्षा ऑपरेशनल कार्यक्षमतेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. ज्यामुळे रात्री उशिरा आणि पीक अवरमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. रात्री उशिरा गाडीची गैरसोय कायम असून, पूर्वी कसारा आणि कर्जतसाठी शेवटच्या लोकल ट्रेन रात्री 12.30 च्या सुमारास सुटत होती. ज्यामुळे उशिरापर्यंत काम करणार्या प्रवाशांना सोयीचे होते. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार या गाड्यांची वेळ थोडी अगोदर केली गेली आहे, ज्यामुळे उशिरा शिफ्ट संपवणार्या प्रवाशांना या गाड्या पकडणे कठीण होत आहे. त्यानंतरची पुढील गाडी पहाटे 3.50 ला आहे, ज्यामुळे प्रवाशांना असुरक्षित क्षेत्रात थांबावे लागत आहे किंवा रात्री मुक्कामी राहावे लागत आहे.
सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या मधील मोठ्या आव्हानांना प्रवाशांना तोंड द्यावे लागते. ठाणे, कल्याण, अंबरनाथ या मार्गावरील प्रवाशांसाठी या वेळेत दोन-तीन ट्रेन सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. सीएसएमटी-कल्याण दरम्यानचे अंतर कमी वेळेत पार करण्यासाठी स्थानिक प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करतात. ज्यामुळे दरवाजात गर्दी होते आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अडचणी येतात. अनेक प्रवाशांना असे वाटते की वेळापत्रक बनवणारे अधिकारी प्रवाशांच्या वास्तवाशी अनभिज्ञ आहेत. रेल्वे कर्मचार्यांनी पीक अवरच्या प्रवासाचा अनुभव घ्यावा, असे सुचवले गेले आहे. प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून मांडण्यात आलेल्या सूचना गाड्यांचा वेळ सुधारित करण्याची गरज आहे.
कसारा आणि कर्जतसाठी शेवटच्या गाड्यांचा वेळ रात्री 12.30 नंतर ठेवणे उशिरा घरी जाणार्या प्रवाशांसाठी अधिक सोयीचे ठरेल. अतिरिक्त सेवा देताना मध्य रेल्वेकडून संध्याकाळच्या पिक अवरमध्ये आणखी दोन-तीन ट्रेन सुरू करणे किंवा स्लो कॉरिडॉरवर मेमू ट्रेन सुरू करणे, गर्दीतून सुटका होण्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यासाठी कर्जत आणि कसारासाठी कल्याण येथून शटल गाड्या सुरू करणे सर्वात चांगला पर्याय आहे. दर 15 मिनिटांनी शटल गाड्या सुरू केल्यास या मार्गावरील प्रवाशांची गर्दीतून सुटका होऊ शकते. कर्जत येथून रात्री पावणे अकरानंतर एकही उपनगरीय लोकल मुंबईसाठी नाही. मुंबईचे उपनगर म्हणून विकसित झालेल्या कर्जत परिसरात भागाची अशी अवस्था असेल तर उपनगरीय सेवेचा विस्तार नक्की कुठे आणि कसा झाला आहे, याचा विचार प्रवासी संघटना करीत आहे. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यात उपनगरीय लोकलबाबत कोणताही राजकारणी तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार बोलत नाहीत, यामुळे प्रवासी वर्गात नाराजी आहे.