| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनास सोमवारी (दि.17) प्रारंभ होत आहे. या अधिवेशनात सत्वपरीक्षेला कोण उत्तीर्ण होणार सत्ताधारी की विरोधक, हे दिसून येणार आहे. अजित पवार गटाच्या सहभागाने सत्ताधाऱ्यांचे पारडे खूपच जड झालेले आहे. त्यांच्यापुढे विरोधक किती तग धरु शकतात हे स्पष्ट होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
मविआची बैठक
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, ठाकरे गट, शेकाप, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी बैठक घेऊन घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवले आहे. अर्थात आम्ही चहापानावर बहिष्कार घातलेला असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्ध करीत सरकारच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली. फोडाफोडीचे राजकारण, राज्यातील मुलभूत समस्यांकडे राज्यकर्त्यांचे होत असलेले दुर्लक्ष आदी मुद्यांवरुन त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
विरोधी पक्षनेता काँग्रेसचा?
दरम्यान, या अधिवेशनात विरोधी पक्षनेता कोण होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. यापूर्वी अजित पवार हे या पदावर कार्यरत होते. पण तेच आता उपमुख्यमंत्री झाल्याने या पदावर काँग्रेसने दावा केला आहे. यावरही आता निर्णय होणार आहे. याशिवाय विविध प्रश्नांवरुनही सत्ताधारी, विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेसने विरोधीपक्षनेतेपदावर दावा केलाय. त्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून सहमती दर्शवली आहे. काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार नावांची जोरदार चर्चा आहे. सुनील केदार, विजय वड्डेटीवर, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची सध्या काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. बाळासाहेब थोरात काँग्रेस गटनेते राहणार त्यात बदल नाही, असे समजतेय.