। पनवेल । प्रतिनिधी ।
कौटुंबिक वादाचा राग मनात धरुन एका 31 वर्षीय विवाहितेने आपल्या पतीवर चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तळोजा येथे उघडकीस आली आहे. या विवाहितेने आपल्या सासूच्या चेहऱ्यावर देखील गरम पाण्यासारखे रासायनिक द्रव्य ओतून तिला दुखापत करुन पलायन केले आहे. तळोजा पोलिसांनी या घटनेनंतर फरार झालेल्या विवाहितेवर गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील 45 वर्षीय जखमी पती रिक्षा चालक असून, तो तळोजा गावात एकत्र कुटुंबासह राहण्यास आहे. मात्र, या रिक्षा चालकाच्या पत्नीला एकत्र कुटुंबामध्ये राहायचे नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या दोघा पती- पत्नीमध्ये याच कारणावरून वाद सुरु होते. तसेच त्यांच्यामध्ये वारंवार भांडण देखील होत होती. याच कौटुंबिक कारणावरुन या रिक्षा चालकाच्या पत्नीने पतीवर धारदार चाकूने वार करुन गंभीर दुखापत केली.
यावेळी सासु वाचवण्यासाठी धावून आली असताना, या विवाहितेने तिच्यावरही घरात असलेले गरम पाण्यासारखे कडक द्रव्य तिच्या तोंडावर ओतून तिला देखील दुखापत केली. या क्रूर कृत्यानंतर या विवाहितेने गुन्ह्यात वापरलेला चाकू सोबत घेऊन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरातून पलायन केले. या घटनेनंतर जखमी पती व सासू या दोघांनी रुग्णालयात उपचार घेऊन तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील फरार झालेल्या विवाहितेच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी दिली.







