| मुंबई | वृत्तसंस्था |
भारतीय संघ आशिया कप 2023 च्या सुपर 4 मध्ये पोहोचला आहे. या फेरीत टीम इंडिया आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 10 सप्टेंबरला खेळणार आहे. याआधी ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मात्र, पावसामुळे तो सामना रद्द झाला. पण टीम इंडियाने या सामन्यात फलंदाजी केली होती आणि 266 धावांत गारद झाली. इशान किशनने या डावात चमकदार कामगिरी करत 81 चेंडूत 82 धावांची खेळी खेळली. पण आता राहुल तंदुरुस्त झाल्याने सुपर 4 च्या मेगा मॅचमध्ये राहुल की इशान खेळणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
पण या प्रश्नाचे उत्तर म्हणून असे काही कॉम्बिनेशन तयार होत आहे. ज्यामुळे इशान आणि राहुल या दोघांनाही खेळण्याची संधी मिळू शकते. पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या दोन्ही गट सामन्यांमध्ये फक्त इशान किशन खेळला होता. पण आता राहुल आल्यामुळे कोणाला खेळवायचे याबाबत टीम इंडियाच्या व्यवस्थापनासमोर डोकेदुखी आहे. वर्ल्ड कप संघाची घोषणा करताना अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत या डोकेदुखीचे वर्णन केले होते.
आता जर आपण कॉम्बिनेशनबद्दल बोललो तर, इशान किशन आणि केएल राहुल दोघेही टीम इंडियामध्ये एकत्र कसे खेळू शकतात. शुभमन गिलने नेपाळविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याआधी वनडे फॉरमॅटमधील त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानविरुद्धही गिल 32 चेंडूत केवळ 10 धावा करू शकला. अशा परिस्थितीत गिल बाहेर झाल्यास किशन आणि रोहित शर्मा सलामी देऊ शकतात. वेस्ट इंडिज दौऱ्यातही इशान किशनने गिलसोबत सलामी दिली होती. किशन चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत त्याला वगळण्याचा निर्णय घेणे संघ व्यवस्थापनाला सोपे जाणार नाही.