| रोहा | वार्ताहर |
मी आमदार, खासदार नसताना लोकांची निःस्वार्थीपणे सेवा करते. महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी अहोरात्र धावून जाते. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून सदैव प्रयत्न करत असते. या मतदारसंघाची आमदार म्हणून निवडून आल्यावर आपण एटीएमप्रमाणे 24 तास लोकांना सेवा देणार, अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रालेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी दिली आहे.
रोहा तालुक्यातील शेणवई गावात नुकतीच अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवार चित्रालेखा पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संचालक गणेश मढवी, अभिषेक देशमुख, सचिन देशमुख, नाना पार्टे, संतोष देवकर, पांडुरंग ठाकूर, शंकरराव म्हसकर, शिवराम महाबळे, हेमंत ठाकूर, खांडेकर सर, पं.स.च्या माजी सभापती गुलाब वाघमारे, रवींद्र झावरे, प्रतापराव देशमुख, पांडुरंग साखीलकर आदी मान्यवर व असंख्य नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या की, रोहा तालुक्यातील पश्चिम खोरा म्हणजे शेकापचा बालेकिल्ला होय. पक्षाच्या पडत्या काळात या भागात निष्ठेने काम करणार्या मंडळीने पक्षाला साथ दिली. शेकाप हा गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, सामान्य लोकांच्या हाकेला धावणार्या लोकांचा पक्ष आहे. आजही येथील जनता शेकाप नेते मंडळींवर मनापासून प्रेम करतेय. असे असताना गतवर्षी लोकांची दिशाभूल करून शिवसेनेच्या आमदारांनी बाजी मारली. परंतु, मागील पाच वर्षे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. विकासाच्या नावावर केवळ चमकोगिरी केली गेली. या भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न, मुख्य व अंतर्गत रस्ते, विजेचा प्रश्न फार गंभीर आहे. अपघाताने निवडून आलेल्या आमदरांना लोकांच्या या समस्यांकडे ढुंकूनसुद्धा बघायला वेळ नाही. राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेणारे, 50 खोक्यांसाठी सुरत, गुवाहटी सफर करणारे आणि गर्भश्रीमंत मंडळीच्या सेवेत मग्न असणार्या गद्दारांना गरीब जनतेचे समस्या काय दिसणार, असा सवाल उपस्थित करून चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांचा खरपूस समाचार घेतला.
मला एक संधी द्यावी
येथील लोकांच्या मनात विशेष म्हणजे महिलांच्या मनात विद्यमान आमदारांबद्दल प्रचंड संताप आणि राग आहे. एका महिलेची अडचण दुसर्या महिलेलाच माहिती असते. तुमच्या कृपाशीर्वादाने आपल्या भागातून एक महिला आमदार म्हणून मी निवडून आल्यानंतर महिलांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते नक्कीच सोडविणार आहे. आपणा सर्वांची सेवा करण्याची मला एकदा संधी द्यावी, असे आवाहन चिऊताई पाटील यांनी केले.