। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी तालुक्यातील पाली पाथरट मावलतीवाडी येथे घराच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना गुरूवारी (दि.22) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात वृध्द महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याच्या मागील बाजूस बिबट्याची नखे खोलवर रुतली आहेत. इंदिरा शांताराम धाडवे (75) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकाराने पाली परिसरात भीतीचे वातावरण आहे.
इंदिरा या सकाळच्या सुमारास घरातून बाहेर जात असताना तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने इंदिरा यांनी आरडा ओरडा केला. यावेळी घरातील मंडळी बाहेर धावत आली आणि बिबट्याच्या दिशेने धावल्याने बिबट्याने पळ काढला. जखमी इंदिरा याना लगेचच पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.