नागोठणे पोलिसांनी अवघ्या चार तासात लावला गुन्ह्याचा छडा
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
रायगड जिल्ह्यातील शिहू बेणसे विभागातील डोंगर माथ्यावर असलेल्या करकरणी देवी मंदिर परिसरातील घनदाट जंगलात रविवारी एका महिलेला ठार मारून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेच्या अमानुष व निघृण हत्येने रायगडात एकच खळबळ उडाली आहे. शिहू विभागातील दोन तरुणांनी दाखवलेले धाडस व तत्परता यामुळे आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे. आरोपीच्या मोटारसायकल क्रमांकावरून नागोठणे पोलिसांनी गुन्ह्याचा तात्काळ छडा लावला, अवघ्या चार तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकण्याची दमदार कामगिरी केली. येथे डोंगरमाथ्यावर श्री करकरणी देवीचे प्रसिद्ध मंदिर असून याठिकाणी भाविक सातत्याने मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत जात असतात. येथील सभोवतालचा परिसर घनदाट जंगलभागाने व्यापला आहे. या घनदाट जंगलाचा फायदा घेऊन महिलेला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली.
याबाबत फिर्यादी जयेश यशवंत घासे व नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 3 ते 7 वाजताच्या दरम्यान घटना घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपी विजय लक्ष्मण शिद वय: 22 राहणार उनाटवाडी (भिसे खिंड)हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्र.एम एच 04 FN 4496 घेऊन करकरणी मंदिर परिसरात आला होता. यावेळी त्याच्या समवेत असलेल्या वांगणी गावच्या महिलेशी (चुलत आत्या), मुळ गाव उनाटवाडी, हिच्यासोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर तिच्या हत्येत झाल्याचे पोलीसांच्या तपासातून समोर आले आहे.
यावेळी मंदिर परिसरात एल एन टी येथे नव्याने सुरु असलेल्या प्रकल्पाच्या साईटवर सुरक्षा रक्षक असलेले चेतन गदमळे व जयेश घासे यांना आरोपी तरुण विजय शिद याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. सदर आरोपींनी महिलेला जंगलात ठेऊन दोन वेळा मंदिर परिसराच्या पायथ्याशी आल्याचे तरुणांनी पाहिले. आरोपीने कुणाला काही कळण्याच्या आत महिलेला मंदिराच्या मध्यावर असलेल्या मोकळ्या पटांगणापासून काही अंतरावर नेऊन ठार मारून आपल्या मोटारसायकल मधील पेट्रोल नेले व तिला मोठ्या दगडाच्या चिर्यात कोंबून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मृत महिलेचे पाय व हात जळालेल्या स्थितीत आढळून आले. आरोपीने या गुन्ह्यात मृत महिलेने सोबत आणलेल्या कपड्याच्या पिशवीतील साड्या व अन्य कपडे तिच्यावर जाळण्यासाठी टाकल्याचे आढळले.
काहीतरी वेगळे घडत असल्याची चाहूल लागलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनी या वेळेत जंगल भागातून धूर येताना पाहिला. त्यानंतर त्यांनी पायथ्याशी उभ्या असलेल्या मोटरसायकलचा व नंबरचा फोटो मोबाईलमध्ये काढून घेतला व वर घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी महिला दगडांच्या चिर्यात जळत असल्याचे चेतन व जयेश या दोन तरुणांच्या निदर्शनास आले. हे भयानक दृश्य पाहून हादरलेल्या या तरुणांनी तात्काळ स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक व पोलीस घटनास्थळी पोहोचले. व गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत रामेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनास्थळ व परिसर पाहणी केली. व महिलेचा मृतदेह शवं विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
यावेळी येथील दोन तरुणांनी पोलिसांना मोटारसायकलचा क्रमांक दिला होता, शिवाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात सदर आरोपी तरुण बेपता झाल्याची नोंद नागोठणे पोलिसात झाली होती. यावेळी त्याचा मोटारसायकल क्रमांक पोलिसांकडे नोंद होता. त्यावरून या गुन्ह्यातील मोटारसायकल व बेपत्ता तक्रारीत नोंद असलेला क्रमांक एकच असल्याची माहिती घेऊन आरोपीच्या घराचा पत्ता मिळवून आरोपीला पोलिसांनी अटक केले. यावेळी तपासात आरोपी विजय शिद याने गुन्ह्याची कबुली दिली.
घटनेचा पंचनामा व गुन्ह्याच्या स्थळाची पाहणी दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंड,े पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत रामेश्वर स्वामी (श्रीवर्धन), नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार, पोलीस हवालदार विनोद पाटील, पोलीस हवालदार दिनेश ढेंने, पो.ह ब्रिजेश भायदे, पो.ना.नितीन गायकवाड, पोलीस शिपाई देवेंद्र भोईर, रामनाथ ठाकूर, हेमराज खटगावकर आदी उपस्थित होते. सदर गुन्ह्याची पाली पोलीस स्थानकात नोंद झाली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नरनवार करीत आहेत.