। पेण । प्रतिनिधी ।
पेणमधील पोलीस हवालदार राजू पाटील उर्फ राजीव परशुराम पाटील (रा.मळेघर, वाशी नाका) याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलिसाचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेली 2 वर्ष राजू पाटीलने महिला हवालदारच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिला त्रास दिला असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
याप्रकरणी महिला पोलिसाने वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर पेण पोलीस ठाण्यात हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजू पाटील हा गेली 18 ते 20 वर्ष कायम एकाच जागी पेण डीवायएसपी कार्यालयात कार्यरत असल्याने दादागिरी करत असल्याचा आरोपही पिडित महिलेने केला आहे. त्यामुळे राजू पाटील यांना तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी पिडित महिलेसह पेणमधील महिलांनी केली आहे.
हा गुन्हा पोलीस खात्यांतर्गत असल्याने आधी प्राथमिक चौकशी अहवाल तयार होईल. त्यानंतर या गुन्हयाची विभागांतर्गत चौकशी होईल. नंतरच गुन्हयाची कारवाई होईल. सदरील प्रकाराविषयी आरोपी राजू पाटील याने मात्र ज्याप्रमाणे माझ्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे असा काहीही प्रकार घडलेला नसून माझी बदनामी करण्याचा हा पूर्णतः डाव आहे. मी पूर्ण चौकशीला सामोरे जायला तयार आहे. न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याने मला योग्य तो न्याय मिळेल, अशी माझी खात्री असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
चौकशीअंती कारवाई
सदरील प्रकाराबाबत पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांनी अ गुन्हा दाखल झाला असून याबाबत योग्य ती चौकशी सुरू असल्याचे सांगितले. अतिरिक्त पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरील प्रकारात योग्य ती चौकशी करून त्यानंतरच मत मांडण्यात येईल. तसेच कामानिमित्त सध्या रत्नागिरीत आहे, आल्यानंतर काय प्रकार आहे त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.