। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी-तळवली दरम्यान रस्त्यालगतच्या खड्ड्यात 35 ते 40 वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पाहणी केली असता मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार महिलेचा मृत्यू सुमारे पाच दिवसांपूर्वी झाला असावा.
मृत महिलेच्या अंगावर कुर्ती व निळ्या रंगाची पॅन्ट असून उजव्या हातात बांगडी आढळली आहे. ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी सुरू आहे. हत्या, अपघात किंवा इतर कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला याचा तपास सुरू असून, घातपाताची शक्यताही पोलिसांनी नाकारलेली नाही.
याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.
महामार्गालगत आढळला महिलेचा मृतदेह
