खालापूर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम
| वावोशी | वार्ताहर |
खालापूर पोलीस ठाण्याच्यावतीने रेझिंग डेनिमित्त महिला आणि बाल सुरक्षा, वाहतूक नियमन आणि सायबर क्राईम जनजागृती अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षा आणि सायबर गुन्हे टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा होता. पहल नर्चरिंग लाईव्स कौशल्य प्रशिक्षण केंद्र, खालापूर आणि विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, गोरठण बुद्रुक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखालील टीमने विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.
या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक अलोक खिसमतराव, पोह. जगधने, पोह. दिनेश भोईर, मपोह. कांबळे, पोशि. पवार, मपोशि. शिंदे आणि पोशि. गणेश चौधरी यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी महिला व बालक सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि सायबर गुन्ह्यांबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डायल 112 : हा क्रमांक आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी केला जातो, पोलीस काका/पोलीस दिदी संपर्क: विद्यार्थ्यांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक पोलिसांचे संपर्क क्रमांक दिले गेले. सायबर क्राईम हेल्पलाईन: सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक व अधिकृत वेबसाइटची माहिती, शस्त्रांची ओळख: विद्यार्थ्यांना पोलिसांकडे असलेल्या शस्त्रांची माहिती देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्यात पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाला.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्यांना भेडसावणार्या समस्या आणि तक्रारी पोलीस अधिकार्यांसमोर मांडल्या. यावर अधिकार्यांनी तत्काळ उपाययोजना सुचवून त्यांना योग्य सल्ला दिला. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडत खालापूर पोलीस विभागाकडून समाजात सुरक्षिततेचा संदेश रुजवण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आला.