। नेरळ । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजेनचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लाडक्या बहिणींना भेट देत योजनेचे 3 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. हे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये महिलांनी एकच गर्दी केली होती. तसेच, एका एटीएममध्ये 15 महिला अक्षरशः दाटीवाटीने घुसल्या होत्या.
दरम्यान नेरळ शहरातील बँक ऑफ बरोडाच्या शाखेसमोरील रस्ता लहान आहे. मात्र, त्यावर बँकेत पैसे काढायला आलेल्या महिलांचे नवरा, भाऊ आदींनी दुचाकी पार्क करून ठेवल्या होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी उद्भवली होती यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी बँकेतून 3 हजार काढले खरे पण नवर्यांना 500 रु.चा भूर्दंड सहन करावा लागला.