माजी विजेता जपान बाद
| ऑकलंड | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेला नवा जेता मिळणार आहे. अमेरिका, जर्मनी व नॉर्वे या तीन माजी विजेत्यानंतर आता जपान या माजी विजेत्या देशाचेही आव्हान संपुष्टात आले. स्वीडनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानवर 2-1 असा विजय मिळवला आणि अंतिम चारमध्ये प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर स्पेनचे आव्हान असणार आहे. स्पेनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नेदरलँड संघावर 2-1 असा विजय साकारला व आगेकूच केली.
जपानने 2011 मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. तसेच 2015 मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदाच्या स्पर्धेमध्येही त्यांनी साखळी फेरीत घवघवीत यश संपादन केले. अंतिम 16 फेरीच्या लढतीत जपानने नॉर्वेवर 3-1 अशी मात केली. या सर्व लढतींमध्ये पहिला गोल जपानकडूनच करण्यात आला होता. जपानला मात्र स्वीडनविरुद्धच्या लढतीत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. अमांडा इस्टेड हिने 32 व्या मिनिटाला स्वीडनसाठी पहिला गोल केला. जपान प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच मागे राहिला. फिलीप्पा अँजेलदाल हिने 51 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. जपानकडून 87 व्या मिनिटाला गोल करण्यात आला. होनोका हयाशी हिने हा गोल केला.