| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान व्हावा, यासाठी पनवेल कर्जतदरम्यान रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून या मार्गात तीन बोगद्यांचा समावेश आहे. मुंबई महानगरातील सर्वात मोठ्या बोगद्याचे काम सध्या या मार्गावर सुरू आहे. एकूण 2.6 किमीपैकी एक किमी लांबीच्या बोगद्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. मुंबई महानगरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. परिणामी, नेरुळ खारकोपर उरण हा चौथा उपनगरीय, पनवेल-कर्जत थेट लोकल आणि इतर रेल्वे मार्गिकांच्या विस्ताराचे काम सुरू आहे. सध्या पनवेल कर्जतदरम्यान एकच मार्ग असल्याने मेल, एक्स्प्रेस आणि मालगाड्या याच मार्गावरून धावतात. पनवेल- कर्जत लोकल मार्ग तयार झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-3 (एमयूटीपी-3) अंतर्गत पनवेल कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले येथे एकूण 3,144 मीटर लांबीच्या तीन बोगद्यांची कामे सुरू आहेत. सध्या बोगद्याचे जलरोधकीकरण आणि सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. फेब्रुवारी 2023 पासून वावर्ले बोगद्याचे काम सुरू करण्यात आले असून 6 सप्टेंबर 2023 पर्यंत 1,002 मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. खडक आणि दरड कोसळू नये, म्हणून मजबूत जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच बोगदा नियंत्रण प्रणाली, प्रकाश व्यवस्था आणि वायुवीजन प्रणालीचे काम सुरू आहे.