शनिवार, रविवार सुट्टीत अफाट गर्दी, सुविधांसह सुरक्षिततेचा अभाव
| रेवदंडा | प्रतिनिधी |
पावसाळा सुरू झाला की तरूणाईला वेध लागतात ते वर्षासहलींचे, डोंगर कपाऱ्यातील वाहणाऱ्या धबधब्यातील धरणातील घावणारे पाणी अंगावर घेण्यासाठी आतुरलेली युवा मंडळी वर्षासहलीचे प्लनिंग करतात. मुरूड तालुक्यात्तील फणसाड अरण्यातील फणसाड डॅमला तरूणाईच्या उत्साहाचा बहर वर्षा सहलीच्या निमित्ताने पहावयास मिळतो.
मुरूड तालुक्यातील बोर्ली येथून अंदाजे 6 ते 7 किमी अंतरावरील वळणा वळणाच्या रस्त्याने जाऊन भोईघर गावावरून पुढे काजुवाडी, बेलवाडी गावाच्या पुढे डोंगरात फणसाड अरण्यातील फणसाड डॅमवर जाता येते. पावसाळी पाण्याने तुंडूब भरलेले धरण तसेच आजुबाजूच्या डोंगर कपारीतील मनमोहक दृष्य, धरणावरून काजुवाडी तसेच बेलवाडी गावासह धरणामुळे परिसरातील हिरवीगार शेतीतील नागरीचे दृश्य डोळ्यांना विलोभनिय निसर्गसौंदर्याने भुरळ पाडते.
फणसाड धरणातून बोर्ली पंचक्रोशीतील 22 गावांना पाणीपुरवठा करते. शासनाच्या पाटबंधारे विभाग कोलाडच्या अखत्यारीत हे धरण असल्याचे सांगितले जाते.
परंतु, नजीकच्या भोईवर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या फणसाड धरणाचा सोयरसुतक नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत येथे वर्षासहलप्रेमी मंडळीसाठी सुविधा पुरविल्या जात नाही, असे म्हटले जाते.
फक्त पावसाळी फणसाड डॅमला वर्षा सहलीच्या निमित्ताने मोठी गर्दी होते. मात्र अनेक सुविधाचा अभाव येथे आढळतो, बाहेरून वर्षा सहलीसाठी येणाऱ्या मंडळींना रस्त्यावर कुठेही मार्गफलक नसल्याने चुकीच्या मागनि जात नाही ना, अशी शंका मनात घेऊनच पुढे सरकावे लागते. रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना फणसाड डॅम कुठे आहे, हा प्रश्न पडतो.







