दोन कट्टे, दोन जिवंत काडतुसे आणि एर्टिगा कार जप्त
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रीती पॅलेस हॉटेलसमोर सापळा रचून केलेल्या या कारवाईत दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे आणि एर्टिगा कार असा एकूण 7 लाख 52 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी शुभम उल्हास पाटील (28, व्यवसाय चालक, रा. पार आळी, शहापूर, ता. अलिबाग, जि. रायगड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे, दोन जिवंत काडतुसे आणि एमएच 46 सीवाय 4300 क्रमांकाची एर्टिगा कार जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या शुभम पाटील याच्याविरोधात यापूर्वी पोयनाड पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार रवींद्र मुंडे, प्रतीक सावंत, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे आणि पोलीस शिपाई प्रदीप खरात यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत.
